Home Breaking News डोक्यात गोळी झाडली! बांगलादेशात विद्यार्थी नेत्यावर जीवघेणा हल्ला

डोक्यात गोळी झाडली! बांगलादेशात विद्यार्थी नेत्यावर जीवघेणा हल्ला

0
110
देश पुन्हा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर?
ढाका/खुलना :

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी पडली असून, एका विद्यार्थी नेत्यावर थेट डोक्यात गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोतालेब सिकदर असे जखमी विद्यार्थी नेत्याचे नाव असून, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बांगलादेशातील खुलना शहरात सकाळी 11.45 च्या सुमारास मोतालेब सिकदर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळी थेट त्यांच्या डोक्यात लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक
स्थानिक वृत्तसंकेतस्थळ द डेली स्टारच्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करताना सिकदर यांची अवस्था अतिशय गंभीर होती. डॉक्टरांकडून त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया व उपचार सुरू असून पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मोतालेब सिकदर कोण आहेत?
मोतालेब सिकदर हे नॅशनल सिटिझन पार्टीचे प्रमुख विद्यार्थी नेते आहेत. ते पक्षाच्या वर्कर्स फ्रंटचे केंद्रीय प्रमुख असून खुलना डिव्हिजनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भारताविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे पक्ष चर्चेत होता.
हत्या करण्याचाच उद्देश?
42 वर्षीय सिकदर हे याआधीही अनेक आंदोलने आणि विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय राहिले आहेत. 2004 साली एका हिंसक विद्यार्थी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. ते खुलना येथील सोनाडांगा भागातील शेखपाडा पल्लीचे रहिवासी आहेत. थेट डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने हा हल्ला पूर्वनियोजित आणि जीवे मारण्याच्या उद्देशानेच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आधीही झाला होता विद्यार्थी नेत्याचा खून
गंभीर बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच ढाका येथे शरीफ उस्मान हादी नावाच्या विद्यार्थी नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थी नेत्यावर झालेल्या हल्ल्यामुळे बांगलादेशात मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे.
आता या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे? राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार का? बांगलादेश पुन्हा हिंसाचाराच्या गर्तेत जाणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.