Home महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा आज निकाल

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा आज निकाल

0
92
– संपूर्ण राज्याचे लक्ष निकालांकडे
मुंबई | प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील अनेक नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्याचबरोबर विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 23 नगरपरिषद व नगरपंचायतींचे मतदान 20 डिसेंबर 2025 रोजी पार पडले होते.

आज या सर्व निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून सकाळपासूनच मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही वेळातच झटपट निकाल समोर येणार असून प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीचा निकाल क्षणोक्षणी स्पष्ट होणार आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत, कडेकोट बंदोबस्त
या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली होती. आज निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नसून आगामी विधानसभा व लोकसभा राजकारणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. काही ठिकाणी महायुती, महाविकास आघाडी किंवा स्थानिक युतीच्या माध्यमातून पक्षांनी निवडणुका लढवल्या, तर अनेक नगरपरिषदांमध्ये पक्ष स्वतंत्रपणेही मैदानात उतरले होते.
यामुळे आज जाहीर होणारे निकाल राज्यातील राजकीय ताकद, जनमताचा कल आणि स्थानिक पातळीवरील पक्षांची स्थिती स्पष्ट करणारे ठरणार आहेत.

राज्यासह देशाचे लक्ष
या निवडणुकांकडे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील राजकीय निरीक्षकांचेही लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता कोणाच्या हाती जाते, कोणत्या पक्षाला किती यश मिळते आणि कुठे अनपेक्षित निकाल लागतात, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
थोड्याच वेळात निकाल स्पष्ट
मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. येत्या काही तासांत सर्व निकाल स्पष्ट होतील आणि राज्याच्या राजकारणात कोणाला मोठा धक्का तर कोणाला मोठे यश मिळते, हे ठरणार आहे.