मुंबई | पुणे | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट जाणवू लागली आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरला असून ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, थंडीसोबतच वाढते हवेतील प्रदूषण ही नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
मुंबई आणि उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबईकरांसाठी थंडीचे राहणार आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. धुक्यामुळे सकाळी ५ ते ९ या वेळेत रस्ते आणि महामार्गांवरील दृश्यमानता मोठ्या प्रमाणात घटली असून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दुसरीकडे, पुणे शहरात गेल्या आठ दिवसांत हवेतील प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. हिवाळ्यातील शांत वारे, वाढती बांधकामे आणि वाहनांची संख्या यामुळे प्रदूषणाचे सूक्ष्म कण हवेतच साचून राहत आहेत. पुण्यातील अनेक भागांत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १८० च्या पुढे गेला असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि दम लागण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सकाळ-संध्याकाळ शहरावर धुक्याबरोबरच धुराचे लोट दिसत असून ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत घातक मानली जात आहे.
हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता असून याचा परिणाम पिकांवरही होऊ शकतो.










